भरदिवसा लाखो रुपयांवर चोरांचा डल्ला, सेफी सिटी - सीसीटीव्हीचा पोलिसांसह राज्यकर्त्यांना विसर

Foto

औरंगाबाद - दीड वर्षापूर्वी मोठा गाजावाजा करीत ‘सेफ सिटी’ची घोषणा तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांनी केली होती. मात्र, शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवूनही राजरोस चोर्‍या होत आहेत. चोरटे पोलिसांच्या नाकावर टिच्चून भरदिवसा लाखो रुपयांचा ऐवज पळवून नेत आहेत. ऐन दिवाळीत चोरीच्या घटना वाढल्या असून, पोलिस मात्र अजूनही तपासातच गर्क आहेत. यामुळे दिवाळी खरेदीसाठी कॅश घेऊन निघावेे की नाही, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहेे. 

 

सेफ सिटी’ प्रकल्पांतर्गत शहरात विविध चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्या कॅमेर्‍यांना गुंगारा देऊन चोरटे भरदिवसा पोलिसांना आव्हान देत पसार होत आहेत. शहरात गेल्या पंधरवड्यात भर वस्तीत उभ्या असलेल्या गाड्यांच्या काचा फोडून लाखो रुपये असलेल्या बॅग पळविण्यात आल्या. या दोन्ही चोर्‍यांचा तपास अद्यापही लागलेला नाही. पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे शहरात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. 


एका आठवड्यात भरदिवसा दोन कार फोडून लाखो रुपयांसह चोरांचा पोबारा 

आठ दिवसांपूर्वी  एका मॉलमध्ये परिवारासह खरेदीसाठी  गेलेल्या  32 वर्षीय व्यापार्‍याच्या  कारची काच फोडून चोरट्यांनी बॅगमधील दोन लाख रुपये रोख व लॅपटॉप पळविल्याची घटना घडली. या घटनेला दोन-तीन दिवस होत नाहीत, तर सिडकोतील एपीआय कॉर्नर भागात भारत बाजारजवळ  उभा केलेल्या कारची काच फोडून 30 लाख रुपये असलेली बॅग चोरांनी लंपास केल्याची घटना घडली. या दोन्ही घटनांमधील आरोपी अद्यापही पोलिसांना सापडले नाहीत. सातारा व एमआयडीसी सिडको पोलिसांनी या चोरीचा शोध लावण्यासाठी एक नाहीतर तब्बल चार पोलिस पथके स्थापन करुन तपास सुरू केला आहे. एका घटनेला आठ दिवस तर दुसर्‍या घटनेला चार दिवस उलटले तरी अद्याप संशयितांची चौकशीच सुरू आहे. गुन्हे शाखा मात्र या घटनांकडे फक्‍त बघ्याच्या भूमिकेत  पाहत असल्याचे दिसत आहे. ऐन सणासुदीच्या काळात या घटना घडल्यामुळे व्यापार्‍यांसह नागरिकांत घबराट पसरली आहे. सध्या दिवाळीसाठी नागरिक बँकेतून पैसे काढत आहेत. पण त्यावर चोरटे भरदिवसा डल्‍ला मारत असल्याने चोरांची नागरिकांच्या मतात दहशत निर्माण झाली आहे. 


दीड वर्षांपूर्वी तत्कालीन पोलिस आयुक़्त यशस्वी यादव यांनी पालकमंत्री रामदास कदम यांना शहरात सीसीटीव्ही कॅमेर्‍यांसाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यावर कदम यांनी 1300 कॅमेरे शहरात लवकरच बसवले जातील, अशी घोषणा केली होती. ‘त्या’ घोषणेतील एक़ही कॅमेरा शहरात अद्यापही बसवण्यात आला नाही. त्यावेळी पोलिस आयुक्‍त यादव यांनी नवीन तंत्रज्ञानाबाबत मोठा गवगवा केला होता. शहरात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅेमेरे बसविले असून, या कॅमेर्‍यातून स्पष्ट फुटेज मिळत नसल्यामुळे विविध चोर्‍यांच्या तपासासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे